आज 31 ऑक्टोंबर…
लोहपुरुष, देशाचे पहिले उपप्रधानमंत्री आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती…
दरवर्षी हा दिवस नॅशनल युनिटी डे म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो.
भारताचे महापुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जीवन परिचय…
पारतंत्र्यात असलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता आपले संपुर्ण जीवन समर्पित करणाऱ्या सरदार वल्लभ भाई पटेल यांना कोण ओळखत नाही ? ते स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते आणि स्वतंत्र भारताचे उपप्रधानमंत्री या रूपात त्यांनी भारतिय संघा समवेत शेकडो रहिवासी राज्यांचे विलीनीकरण केले.
त्यांच्या अविश्वसनीय आणि अद्भुत कुटनितीक कौशल्य आणि नितीगत दृढतेमुळे त्यांना ’लोहपुरूष’ म्हंटल्या गेले.
आज या लेखामधुन आम्ही आपल्याला भारताचे महापुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जीवनाशी निगडीत संघर्ष, त्यांच्या जीवनातील महत्वपुर्ण घडामोडी, भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे महत्वपुर्ण योगदान, त्यांनी मिळवीलेल्या यशाबद्दल सांगत आहोत…. ते अश्याप्रकारे…
भारताचे महापुरूष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जीवन परिचय…
नाव : सरदार वल्लभ भाई पटेल
जन्म : 31 ऑक्टोबर 1875 नडियाद, गुजरात
मृत्यु : 15 डिसेंबर 1950 (मुंबई)
वडिलांचे नाव : झावेरभाई पटेल
आईचे नाव : लाडबाई
पत्नीचे नाव : झावेरबा
मुलांची नावं : दहयाभाई पटेल, मणिबेन पटेल
शिक्षण : एन.के. हायस्कुल पेटलाड, इंस ऑफ कोर्ट लंडन इंग्लंड
पुस्तकं : राष्ट्र के विचार, वल्लभभाई पटेल, वल्लभभाई पटेल के संग्रहित कार्य, 15 खंड
स्मारक : स्टॅच्यू ऑफ युनिटी (Statue of Unity)
वल्लभभाई पटेलांचा जन्म आणि प्रारंभिक जीवन…
वल्लभाईंचा जन्म नडियाद येथे 31 ऑक्टोबर 1875 ला एका जमीनदार परिवारात झाला. झवेरभाई पटेल आणि लाडबाईंचे हे चौथे अपत्य. वल्लभाईंचे वडिल शेतकरी आणि आई एक गृहिणी व आध्यात्मिक धर्मपरायण महिला. वल्लभभाईंना तीन मोठे भाऊ नरसीभाई, विठ्ठलभाई व सोमाभाई आणि एक बहिण जीचे नाव दहीबा पटेल असे होते.
वल्लभभाई पटेल यांचा विवाह…
त्या काळी बालविवाहाची प्रथा असल्याने वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी 1891 साली झावेरबा नावाच्या कन्येशी करून देण्यात आला. त्यांच्या पासुन दहयाबाई आणि मणिबेन पटेल अशी दोन अपत्ये झालीत.
वल्लभभाईंची पत्नी झावेरबा कॅंसर ने पीडित असल्याने त्यांचा आणि वल्लभभाईंचा संसार दिर्घकाळ टिकला नाही 1909 साली त्यांचे निधन झाले.
ज्यावेळी झावेरबांच्या निधनाची बातमी वल्लभभाईंना मिळाली त्यावेळी ते कोर्टात कामात व्यस्त होते. ही बातमी मिळाल्यानंतर देखील त्यांनी आपले कामकाज पुर्ण केले कोर्टातील खटला जिंकले देखील त्यानंतर आपल्या पत्नीच्या मृत्युची बातमी त्यांनी सर्वांना दिली. पुढे आपले संपुर्ण जीवन आपल्या अपत्यांसमवेत विधुर म्हणुन व्यतीत केले.
वल्लभभाई पटेलांचे शिक्षण आणि वकिलीची सुरूवात…
आपले प्रारंभिक जीवन त्यांनी गुजराती मीडियम स्कुल मधुन पुर्ण केले. पुढे त्यांनी इंग्लिश मिडियम शाळेत प्रवेश घेतला. शिक्षण पुर्ण करण्याकरीता त्यांना विलंब लागला. 1897 ला वयाच्या 22 व्या वर्षी त्यांनी 10 वी ची परिक्षा उत्तीर्ण केली.
घरची परिस्थीती बेताची असल्याने महाविद्यालयात न जाता वल्लभभाईंनी घरी राहुनच पुस्तकं उधार घेउन शिक्षण घेतले. शिवाय जिल्हाधिकारी होण्याकरता दिल्या जाणाऱ्या परिक्षेचा अभ्यास सुध्दा त्यांनी घरूनच केला. अभ्यासात ते एवढे हुशार होते की या परिक्षेत त्यांना सगळयात जास्त गुण मिळाले.
1910 साली लाॅ ची पदवी मिळविण्या करता वल्लभभाई इंग्लंड ला गेले. काॅलेज चा त्यांना कुठलाही अनुभव नव्हता परंतु ते बुध्दीने एवढे तल्लख होते की 36 महिन्यांचा कोर्स त्यांनी अवघ्या 30 महिन्यांमधे पुर्ण केला. अश्याप्रकारे 1913 साली वल्लभभाईंनी इंस ऑफ कोर्ट मधून वकिलीची पदवी मिळवीली, या परिक्षेत सर्वाधिक गुण मिळवले आणि काॅलेज मधुन पहिले आले.
त्यानंतर वल्लभभाई भारतात परतले गुजरात मधील गोधरा येथे त्यांनी वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. वकिलीतील त्यांची समज पाहुन ब्रिटीश सरकारने त्यांना कित्येक मोठया पदांवर नियुक्ती देण्यास आमंत्रीत केले परंतु वल्लभभाई पटेलांनी ब्रिटीश शासनाचा एकही प्रस्ताव स्विकारला नाही कारण त्यांना ब्रिटींशांचा एकही कायदा अजिबात पसंत नव्हता आणि ते त्यांचे कट्टर विरोधक होते त्यामुळे ब्रिटींशाकडुन आलेला एकही प्रस्ताव त्यांनी स्विकारला नाही.
अशी मिळाली सरदार ही पदवी…
आपल्या वक्र्तृत्वाने जनसामान्यांना प्रभावित करणाऱ्या सरदार पटेलांनी 1928 साली सायमन कमिशन विरोधात पुकारलेल्या बारडोली सत्याग्रहा दरम्यान लोकांना आपल्या महान विचारांनी फार प्रभावित केले, त्यामुळे इंग्रजांनी अवाजवी वाढवलेल्या करांना न भरण्यावर जनता सहमत झाली त्यामुळे ब्रिटीश व्हाईसराय ला पराभव पत्करावा लागला.
या आंदोलनात आपल्या सशक्त नेतृत्वाने वल्लभभाई पटेल जनतेत चांगलेच प्रसिध्द झाले आणि बारडोलीतील लोक त्यांना सरदार म्हणु लागले, त्यामुळे पुढे सरदार त्यांच्या नावा आधी जोडल्या गेले.
काॅर्पोरेशनच्या अध्यक्षांपासुन ते देशाच्या पहिल्या गृहमंत्रीपदापर्यंतचा प्रवास…
दिवसेंदिवस सरदार वल्लभभाई पटेलांची ख्याती वाढत चालली होती आणि त्यामुळेच अहमदाबाद येथील निवडणुकांमधे त्यांनी सतत विजय मिळवला. 1922, 1924 आणि 1927 ला ते अहमदाबाद नगरपालीकेचे अध्यक्ष म्हणुन निवडल्या गेले.
1931 साली वल्लभभाई पटेल कॉंग्रेस च्या 36 व्या अहमदाबाद अधिवेशनात स्वागत समितीचे अध्यक्ष बनले आणि ते गुजरात प्रदेशाच्या कॉंग्रेस समितीचे पहिले अध्यक्ष म्हणुन नियुक्त झाले पुढे 1945 पर्यंत ते गुजरात कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर राहिले.
या दरम्यान त्यांना अनेकदा कारागृहात देखील जावे लागले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वल्लभभाई पटेल भारताचे गृहमंत्री आणि उपप्रधानमंत्री झाले. तसे पाहाता सरदार वल्लभभाई पटेल यांची ख्याती आणि प्रसिध्दी एवढी पसरली होती की प्रधानमंत्री होण्याचे सामथ्र्य त्यांच्यात होते परंतु महात्मा गांधीजीं मुळे त्यांनी स्वतःला या स्पर्धेपासुन दुर ठेवले आणि जवाहरलाल नेहरूंना देशाचे पहिले प्रधानमंत्री बनविण्यात आले.
स्वदेशी साम्राज्यांना एकत्रीत करण्याकरीता सरदार पटेल यांनी निभावली महत्वपुर्ण भुमिका…
स्वतंत्र भारताचे गृहमंत्री झाल्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी सर्वात आधी भारतातील वेगवेगळया साम्राज्यातील राजांना आपल्या राजनैतिक दुरदर्शीपणाचा आणि बुध्दीमत्तेचा वापर करत संघटीत केले आणि वेगवेगळया राज्यांचे स्वप्न सत्यात उतरणे शक्य नसल्याची जाणीव भारतीय संघातील 565 साम्राज्यांच्या राजांना करून दिली.
त्यानंतर भारतात विलीन होण्याकरता सर्व राज्यांनी सहमती दर्शवली परंतु हैदराबाद चे निजाम, जुनागढ आणि जम्मु कश्मीर च्या नवाबांनी मात्र आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास विरोध दर्शविला. वल्लभभाई पटेल यांनी आपल्या कुशाग्र बुध्दीमत्तेच्या बळावर सैन्याचा वापर करीत या तिन राज्यांना आपले साम्राज्य भारतात विलीन करण्यास सहमत करून घेतले.
वल्लभभाई पटेलांनी अश्या तऱ्हेने भारतीय संघाला कोणत्याही युध्दाशिवाय शांततेच्या मार्गाने एकत्रीत केले. या महान कार्यामुळे त्यांना लोहपुरूष ही पदवी देण्यात आली.
सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे विभाजन…
फाळणी संघर्ष आणि आंदोलनात मुस्लीम लीग नेता मुहम्मद अली जिन्ना यांच्या नेतृत्वात स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगदी आधी पेटलेल्या हिंदु मुस्लीम संघर्षाला हिंसात्मक स्वरूप देण्यात आले होते.
सरदार पटेल यांच्या मते स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अश्यात तऱ्हेने हिंसात्मक आणि सांप्रदायिक दंगे केंद्र सरकारच्या कार्यक्षमतेला कमजोर बनवतील परिणामी असे संघर्ष लोकतांत्रिक राष्ट्राला मजबुत करण्याकरीता बाधा पोहोचवतील.
या समस्येला निकाली काढण्याकरीता पटेल यांनी 1946 ला सिव्हील वर्कर वी.पी मेनन यांच्यासमवेत काम केलं आणि फाळणी परिषदेदरम्यान भारताचे प्रतिनीधीत्व केले.
सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन…
1950 साली सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्वास्थ्य बिघडु लागले. 2 नोव्हेंबर 1950 ला त्यांची प्रकृती एवढी बिघडली की ते अंथरूणावरून उठण्यास देखील असमर्थ होते. पुढे 15 डिसेंबर 1950 ला आलेल्या हृदयविकाराच्या तिव्र धक्क्याने या महान आत्म्याची प्राणज्योत मालवली.
सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळालेले सन्मान..
1991 साली त्यांना मरणोत्तर भारताच्या सर्वोच्च नागरिक सन्मान भारत रत्न ने गौरविण्यात आले. त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबर ला 2014 साली राष्ट्रीय एकता दिवसाच्या रूपात घोषित करण्यात आले.
या व्यतिरीक्त भारत सरकार व्दारा 31 ऑक्टोबर 1965 ला सरदार पटेल यांच्या स्मरणार्थ पोस्टाने डाक तिकीट प्रकाशित केले एवढेच नव्हे तर त्यांच्या नावावर अनेक शिक्षण संस्था, रूग्णालयं आणि विमानतळांचे नामकरण करण्यात आले… जसे की
सरदार वल्लभभाई पटेल कृषी आणि प्रौद्योगिकी विश्वविद्यालय मेरठ
सरदार वल्लभभाई राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, सुरत
सरदार पटेल विश्वविद्यालय, गुजरात
सरदार पटेल विद्यालय, नई दिल्ली
सरदार वल्लभभाई पटेल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी, वासद
स्मारक सरदार पटेल मेमोरियल ट्रस्ट
सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय स्मारक, अहमदाबाद
सरदार सरोवर बांध, गुजरात
सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एयरपोर्ट, अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर एक दृष्टीक्षेप – Sardar Vallabhbhai Patel ki jivani
1913 साली लंडन येथुन बॅरिस्टरची पदवी संपादन करून भारतात परतले
1916 मध्ये लखनौ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनात वल्लभभाईंनी गुजरात चे प्रतिनिधीत्व केले.
1917 साली ते अहमदाबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत निवडुन आले. 1917 मधे शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचे त्यांनी प्रतिनीधीत्व केले, शेतसारा बंदी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले, अखेर ब्रिटीशांना झुकावेच लागले, सगळे कर माफ केले, सरदार पटेलांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला यश मिळाले 1918 साली जुन महिन्यात शेतकऱ्यांनी विजयोत्सव साजरा केला त्यावेळी महात्मा गांधीजींना आमंत्रीत करून त्यांच्या हस्ते वल्लभभाईंना मानपत्र देण्यात आले.
1919 साली रौलेट अॅक्ट विरोधात वल्लभभाई पटेलांनी अहमदाबाद येथे खुप मोठा मोर्चा काढला.
1921 मधे गुजरात प्रांतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षस्थानी त्यांची निवड झाली.
1923 साली ब्रिटीश शासनाने तिरंग्यावर बंदीचा कायदा केला त्या विरोधात वेगवेगळया ठिकाणांवरून हजारो सत्याग्रही नागपुर येथे एकत्रीत झाले, साडेतीन महिने जोशपुर्ण लढाई सुरू झाली. या लढाईला संपवण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले.
1928 मधे बारडोली येथे वल्लभभाईंच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या हिताकरता शेतसारा बंदी आंदोलन सुरू झाले. सुरूवातीला वल्लभभाईंनी ब्रिटीश सरकारला शेतसारा कमी करण्याचे निवेदन दिले परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. वल्लभभाईंनी योजनाबध्द आणि सावधानतेने आंदोलन सुरू केले. आंदोलनाला दाबण्याकरीता ब्रिटीशांनी अनेक अयशस्वी प्रयत्नं केले परंतु त्याच वेळी मुंबईत विधानसभेच्या काही सदस्यांनी आपापल्या पदांचा राजिनामा दिला. याचा परिणाम हा झाला की सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या सशर्त मान्य केल्या. बारडोलीत शेतकऱ्यांनी वल्लभभाईंना ’सरदार’ हा बहुमान दिला.
1931 कराचीत झालेल्या राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी वल्लभभाई होते.
1942 ला ’भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाल्यामुळे त्यांना जेल मधे जावे लागले.
1946 ला स्थापन झालेल्या मध्यवर्ती अभिनय मंत्रीमंडळात ते गृहमंत्री होते. पटेल घटनासमितीचे सदस्य देखील होते.
15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यप्राप्ती नंतर पहिल्या मंत्रीमंडळात उपपंतप्रधान पदाचे स्थान त्यांना मिळाले त्यांच्या जवळ गृह, माहिती, प्रसारण, तसेच घटक राज्य संबंधीत प्रश्नांची खाती देण्यात आली. वल्लभभाईंनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळ जवळ सहाशे साम्राज्यांचे भारतात विलीनीकरण केले, हैद्राबाद संस्थान देखील त्यांनी घेतलेल्या पोलिस कारवाईमुळे 17 सप्टेंबर 1948 ला भारतात विलीन झाले.
वेसरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर आधारीत चित्रपट – Sardar Vallabhbhai Patel Film
1993 साली सरदार वल्लभभाई पटेल यांची बायोपिक फिल्म ’सरदार’ प्रदर्शित झाली होती या चित्रपटाचे दिग्दर्शक केतन मेहता होते या चित्रपटात सरदार वल्लभभाईंची भुमिका परेश रावल यांनी साकारली होती.
स्टैच्यू ऑफ यूनिटी – Statue of Unity
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मरणार्थ जगातील सर्वात उंच मूर्ति स्टैच्यू ऑफ यूनिटी तयार करण्यात आली. त्याची उंची जवळपास 182 मीटर आहे. या मुर्तीची कोनशिला 2013 साली सरदार पटेल यांच्या जयंतीदिनी भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात आली होती आणि नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच 2018 ला जगातील सर्वात उंच प्रतिमेचे उद्घाटन करण्यात आले.
अश्या तऱ्हेने सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपले संपुर्ण जीवन देशाला समर्पित केले. त्यांनी केवळ अनेक भागांत वाटल्या गेलेल्या भारतिय संघाला एकिकृत करण्यात आपली महत्वाची भुमिका बजावली असे नाही तर आपल्या बुध्दीमत्तेच्या आणि दुरदर्शितेच्या जोरावर कित्येक असे निर्णय घेतले ज्याचा उपयोग आधुनिक भारताच्या निर्मीतीत झाला. भारताकरीता अश्या महान वीर सुपुत्राचा जन्म होणे गौरवपुर्ण आहे.
या महान विभुतीला ज्ञानी पंडीताला शतशः नमन…!🙏🌹