दंडवत प्रणाम न्युज
धुळ्यात आता मोफत अँजिओप्लास्टी, उत्पन्न अट नाहीः हवे फक्त आधार कार्ड 18 कोटींचा निधी खर्चुन जिल्हा रुग्णालयात कार्डियाक कॅथलॅब युनिट तयार
धुळे:- दोनशे ते पाचशे रुपयात होणारी ईसीजी, टुडी इको तपासणी आणि लाखो रुपये खर्चाच्या हदयविकारावरील चार शस्त्रक्रिया धुळयात लवकरच मोफत केल्या जातील. त्यासाठी राज्य शासनाने १८ कोटी रुपये खर्च खान्देशातील पहिले कार्डियाक कॅथलॅब युनिट-रुग्णालय शहरातील साक्री रोडवरील जिल्हा रुग्णालयात उभारले आहे. या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकावर निःशुल्क उपचार होतील. त्यासाठी उत्पन्नाची कोणतीही अट नसून फक्त आधार कार्ड मागितले जाईल.वर्षभरात ७ हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अशा रुग्णांसाठी धुळ्यातील कार्डियाक कॅथलॅब वरदान ठरणार आहे. सुमारे ६ हजार स्क्वेअर फुटामध्ये हे रुग्णालय बांधले आहे. या ठिकाणी ईसीजी, टुडी इको, कलर डॉपलर, स्ट्रेस टेस्ट, प्लस, बीपी, बॉल्केजेस, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीवर उपचार अन् शस्त्रक्रिया मोफत होतील. त्यासाठी रुग्णालयात १० अद्यावत हायड्रोलिक बेडचे आयसीयू तयार झाले आहे. सुमारे ६ कोटी रुपयांच्या अद्ययावत मशीनव्यतिरिक्त आयएबीपी, इंजेक्टर, रेडियशनची अद्ययावत यंत्रे या विभागात बसवण्यात आली आहेत. त्यामुळे केवळ धुळे-जळगाव, नंदुरबार अथवा नाशिक विभागातील च नव्हे तर महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील हृदयरोगाने ग्रस्त रुग्णावर येथे मोफत उपचार व शस्त्रक्रिया होतील.या कामासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये १८ कोटी मंजूर झाले होते. बंगळुरूच्या कंपनीला कंत्राट देऊन जानेवारी २०२४ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. सुमारे १५ दिवसांपूर्वी बांधकाम, अद्ययावत यंत्रे, साहित्य, फर्निचर व इतर कामे पूर्ण होऊन इमारत रुग्णालयाच्या स्वाधीन करण्यात आली.
खासगी रुग्णालयाचे दर असे
- ईसीजी २०० ते ५००
- टुडी इको १२०० ते १५००
- कलर ड्रॉपलर २५०० ते ३ हजार
- अँजिओग्राफी १० ते ५० हजार
- अँजिओप्लास्टी दीड ते ५ लाख
कॅथलॅबमध्ये मोफत होणार
नर्स कॉल अन् ३५ पदे…
रुग्णाला त्रास जाणवल्यावर रिमोटचे बटन दाबल्यावर नर्स तातडीने येईल. या ठिकाणी एका बटणाने खाली व वर होणारे बेड व इतर सुविधा आहे. कॅथलॅबसाठी टेक्निशियन, परिचारिका, कक्षसेवक व इतर ३५ पदे भरली जाणार आहेत.
खान्देशातील हे पहिले कॅथलॅब युनिट
खान्देशातील हे पहिले कॅथलॅब युनिट आहे. राज्यातील कोणत्याही रुग्णाला या ठिकाणी उपचार घेता येतील. अद्ययावत साहित्य-यंत्रांनी रुग्ण तपासणी होऊ शकेल. रिक्त पदाचा प्रस्ताव गेल्या आठवड्यात शासनाला पाठवला आहे. लवकरच त्याला मंजुरी मिळेल. रुग्णांचा याचा फायदा होणार आहे.
डॉ.दत्ता देगावकर,जिल्हा शल्यचिकित्सक,धुळे.