
◼️
आपल्या पोटी जन्माला आलेल्या मुली या आई-बाबांच्या लाडक्या असतात. पण परक्याचे धन आपल्या हाताने सजवलेले, न्हावूमाखू, खाऊपिऊ घालून, भरवलेले, जोपासलेले, बहरलेलं एक रोपटं असतात.
वयाची २०-२१ वर्षे लाडात वाढवलेले, मायेने सजवलेले, टवटवीत उमलणार कोवळे रूप दुसऱ्याच्या हाती सोपावताना किती बरे जखमा होत असतील! आपली रितच ती. विवाह संस्कृती विवाह सोहळा या सगळ्या रितीरीवाजाने चालत आलेली पूर्वापार प्रथा.

परंपरेनुसार आपणही हे करतोय. तसे पाहिले तर मुलगा, मुलगी दोन्ही आईची सारखीच प्रिय. पण ती घरातून दूर जाताना होणारा गलबला मात्र साऱ्यांनाच रडवून जातो.
पुरुषप्रधान संस्कृतीनुसार स्त्री ही नववधू नाव, गाव, घरदार, माणसे सारे सोडून सासरी येते. त्यांचीच होऊन जाते. आपली कर्तव्य धुरा सांभाळते. नव्या आयुष्यात सुरुवात करून नव्याने जगणे म्हणजे लग्न. घरदार, नवी नाती, त्याचे नवे पण जपता जपता त्यांचे होऊन जाणे.
सारे काही अनाकलनीय, असाधारण अद्वितीय आहे. अशाश्वत तरीही स्वीकारावीच लागते त्याग, समर्पण, आवड, कर्तव्य, जबाबदारी. आपल्या जगण्याला बळ देते, अर्थ, विश्वास आणि पूर्णत्वही. सप्तपदींच्या वचनात देखील याचीच बंधन स्वीकारली जातात. हे ऋणानुबंध, मनमनाच मिलन, सोयरिक, नाती जोडणे ही नवलाईच.
आयुष्यभरासाठी केवढी मोठी स्थित्यंतर, पण तरीही हवेहवेसे. हौसेने स्वीकारलेले चॅलेंज. मोठ्या उमेदीने जीवाचा आटापिटा करून प्रसंगी ऊन वादळ या संसारी प्रेमाचा बहार आणणारी. ही आनंदाची बाब, त्यागाची भावना, कर्तव्याची जबाबदारी प्रत्येक स्त्री आपल्या भूमिका निभावतेच.

कन्या सासुरासी जाये… मंगलाष्टक सुरू होताच आईच मन गहिवरून येते. ती तुळशीला पाण्याची संततधार घालत असते. पण काळजात काहूर भावनांचे डोळ्यांत महापूर अश्रूंचा. कसे असते हे निरोपाचे भारावून टाकणार लेकीचे कन्यादान!
लहानाचे मोठे करून दुसऱ्याच्या ओटीत घालून सोसावे लागते! दुसऱ्याच्या घरासाठी झिजाव लागते नववधूला. म्हणून कन्या ज्या घरात जन्माला येते तिथे जन्मोजन्मीचे पुण्य असतात.
एकीकडे आकर्षक रुखवत मांडलेला असतो. त्यामुळे प्रत्येक जिन्नस, संसार गृहपयोगी असते. त्यामध्ये धनधान्य, भांडीकुंडी, आभूषणे मिठाईचे प्रकार, सुपापासून ते फ्रीज, गाडी रोषणाई सजावटपर्यंत.
सर्वात महत्त्वाचे काय असते? सप्तपदी बांगड्यांचे रिंगण अलंकार सजवलेले त्यांची प्रत्येक अलंकारामधील महत्त्वपूर्ण गुंफलेली नाती, प्रकार, अर्थ आणि समर्पकता यातून खूप साऱ्या गोष्टी सांगून जातात. अनुभवायला मिळतात.
विशेषतः कन्यादान करताना भटजी काका सांगतात की, जावई हा तुमचा पाहुणा, त्या पायावर स्वस्तिक काढा, हळदीकुंकू, अक्षता यांनी यथोचित पूजन, मंत्रोच्चाराने आपल्या कन्येस दान केले जाते.
या पवित्र बंधनात दोन मने आणि घरे ऋणानुबंधांनी जोडली जातात. नशीबवान माणसांच्याच नशिबी कन्यादानाचा पावित्र्य, पुण्य असते मांगल्य असते. आतापर्यंत लाडात वाढलेल्या त्या नववधूला रुसणे, फुगण विसरून सासरची शोभा वाढवायची असते.
स्नेहाचा दरवळ आणि मायेची हिरवळ, सुखशांतीचे घरपण, प्रसन्न अंगण, प्रफुल्लित मन या संदेशासह जबाबदारीने निरोप दिला जातो आणि वात्सल्यरूपी कृतार्थ जीवन हे आई-वडिलांचे संस्कार, मुलींचे विचारधन घेऊनच त्या उंबऱ्यावरचे माप ओलांडतात.
आईने नऊ महिने पोटात वाढवलेले बाळ आणि तळहाताचा पाळणा करून नेत्राचे दीपक करून मोठे केलेले असते. तिचे नाजूक मन जपलेेले असते. पुढे मात्र अनोळखी दुसऱ्या कोणाच्या हातात हात देताना मनात, डोळ्यांत, भविष्यातील खूप सारी स्वप्ने, आशा, आधार, जबाबदारपणा सामावलेला असतो.
मुलीच्या आई-वडिलांच्या आयुष्यातील तो अत्यंत जिव्हाळ्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. काळजाचे पाणी करणारा तो प्रसंग. म्हणून कन्यादान याप्रसंगी मंगलाष्टक सुरू असताना देखील मुलीचे डोळे भरून येतात. स्वाभाविकच आहे आणि हे प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील स्थलांतर, स्थित्यंतर आहे हेच खरे.
स्वतः बरोबरच
कुटूंबाची काळजी घ्या.
स्वस्थ रहा, मस्त रहा
दंडवत पप्रणाम न्युज नेटवर्क चँनेल